(* जर का ह्या लेखाची .gif फाईल आहे त्या आकारात वाचता आली नाही तर ती enlarge करून वाचावी)
Tuesday, 23 August 2011
ब्रह्मदेवाची कालगणना
Tuesday, 16 August 2011
एक छान पुस्तक - आधुनिक विद्यान आणि प्राचीन मंदिरे
आज एक छान पुस्तक वाचण्यात आले - आधुनिक विद्यान आणि प्राचीन मंदिरे. नावात म्हटल्याप्रमाणे ह्या पुस्तकात जुनी मंदिरे आणि त्यात वापरलेले विद्यान ह्यांची माहिती आहे. लेखक आहेत श्री मोरेश्वर कुंटे. श्री कुंटे आणि त्यांच्या पत्नींनी महाराष्ट्रातील १८००० हून अधिक मंदिरे पहिली आहेत. स्वत:च्या M-80 वरून जवळ जवळ सव्वा लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्यांनी पुस्तकात सांगितलेल्या काही गमतीदार गोष्टी
पाणी पडल्यावर आवाज घुमतो असे मंदिरांचे गाभारे (सिंहनाद).
हलण्यारया दीपमाला.
भिंतीला पाणी लागल्यावरच दिसणारी मशिदीच्या भिंतीवरची अक्षरे.
एका विशिष्ट दिवशीच मूर्तीच्या मुखमंडलावर पडणारे सूर्याचे किरण (किरणोस्तव).
ह्या सगळ्या गोष्टी वाचून थक्क व्हायला होते. कुंटे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच ह्या सगळ्याचा नीट अभ्यास व्हायला हवा.
हे पुस्तक वाचतना मला एका पूर्वी वाचलेल्या लेखाची आठवण झाली. त्यात अशी theory मांडली होती कि - कौरवांची मयसभा बांधलेला मयासुर हा मुळात मेक्सिको मधल्या माया संस्कृतीचा माणूस होता. ह्या theory च्या समर्थनासाठी खालील मुद्दे दिले होते –
मयासुर आणि माया ह्या नावातील साधर्म्य
आर्य मंडळी (कौरव / पांडव) हे प्रामुख्याने लाकडाची घरे बांधत. मयसभा हि विटांनी बांधली होती. माया संस्कुतीतील लोक हे विटांचे आणि त्यातही रंगीत विटांचे बांधकाम करण्यात पारंगत होते
मयासुर पाताळलोकातून आल्याचा उल्लेख आहे.. मेक्सिको आणि अमेरिका खंड हे भारताच्या बरोबर खालच्या बाजूला आहेत.
(* जर का हि theory बरोबर आहे हे सिद्ध झाले तर देवलोक होता हे देखील खरे मानावे लागेल आणि देव हे आकाशातून म्हणजे नक्की कुठून येत ह्याचा विचार करावा लागेल)
ह्या सगळ्या गोष्टींचा खरोखर एकदा अभ्यास करायला हवा.
माया संस्कृती आणि महाभारत ह्यातल्या परस्पर संबधाविषयी अजून कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी टिप्पणी मध्ये जरूर लिहावी
Monday, 25 July 2011
मला जरा का २५ वर्षे भूतकाळात जायला मिळाले तर...
२) परत एकदा खूप क्रिकेट खेळेन
३) संध्याकाळी सात...साडे-सातला मंद निरंजन तेवत असलेल्या देवघरापुढे उभा राहून शुभंकरोती म्हणेन
४) दूरदर्शन वरचे शनिवार आणि रविवारचे सिनेमे न चुकता बघेन
५) रात्री कसलीही चिंता न करता , आहेत न आई-बाबा सगळे बघायला, ह्या विचाराने शांत झोपेन
६) दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीची आतुरतेने वाट बघेन
७) बेस्ट बसच्या वरच्या मजल्यावर बसून लांब फेरी मारेन
खरे म्हणजे हे होणे नाही . त्यामुळे सध्या मुलाला ह्या सगळ्या आठवणी सांगण्याचे निमित्त करून मीच त्या परत परत आठवतो आणि त्याच्या नकळत डोळ्यांच्या ओल्या झालेल्या कडा पुसतो
तो काळ थोडाफार अनुभवायच्या असेल तर हि साईट जरुर बघा - http://ddnational.blogspot.com/
Thursday, 21 July 2011
मराठी एअरवेज, फ्लाईट – मुंबई ते कोल्हापूर. फ्लाईट कॅप्टन – पाटील
जॉनी लिवरची छान कॉमेडी
मराठी एअरवेज फ्लाईट – मुंबई ते कोल्हापूर. फ्लाईट कॅप्टन – पाटील
http://www.youtube.com/watch?v=cYTk3RLLPX4
(* मराठीच्या अति-अभिमानी मंडळींनी कृपया हि वीडीओ क्लिप बघून स्वताचे आणि आमच्यावर टीका करण्यारया टिप्पणी लिहून आमचे ब्लड प्रेशर वाढवू नये. आम्हाला ह्यात काही मराठी लोकांची थट्टा केल्यासारखी वाटत नाही. वास्तविक ह्या बरोबर जॉनी लिवरने पंजाब एअरवेज, गुजरात एअरवेज असे देखील सादर केले होते. फक्त त्याच्या वीडीओ क्लिप आम्हाला मिळाल्या नाहीत)
Monday, 18 July 2011
देव आनंदच्या सिनेमांची प्रेक्षक संख्या
मी एका पुस्तकात (बहुदा शिरीष कणेकरांच्या) हा विनोद (अर्थात काल्पनिक) वाचला होता – देव आनंदचा नवीन सिनेमा रीलीज झाल्यावर देव आनंदने प्रत्येक चित्रपटगृहात फोन करून किती प्रेक्षक आहेत ह्याची चौकशी करायला सुरुवात केली. बहुतेक चित्रपटगृहे रिकामीच होती. शेवटी एका ठिकाणी काही प्रेक्षक आहेत असे कळल्यावर देव आनंदने मॅनेजरला विचारले कि – “आत मध्ये एकूण किती प्रेक्षक आहेत?” तेव्हा मॅनेजर म्हणाला – “ते मी तुम्हाला चित्रपट संपल्यावरच सांगेन कारण किती प्रेक्षक आहेत हे बघायला चित्रपटगृहाचे दार उघडले तर, आहेत ते प्रेक्षक पण निघून जातील”
Thursday, 14 July 2011
हे UPA सरकार अजून सत्तेवर कसे?
असे म्हणतात कि ज्यावेळी जँकसन, प्लेगच्या साथीचे कारण पुढे करून पुण्यात अत्याचार करत होता तेव्हा लोकमान्य टिळक पुण्यात नव्हते. ते परत आल्यावर त्यांनी एकच प्रश्न केला – “जँकसन अजून जिवंत कसा?” त्यानंतर चापेकर बंधूंनी जँकसनचा वध केला.
2G, आदर्श, कॉमनवेल्थ गेम्स, वाढती महागाई , सगळीकडे बोकाळेला भ्रष्टाचार आणि सतत होणारे बॉम्बस्फोट ह्या पार्श्वभूमीवर हाच प्रश्न थोडा बदलून विचारावासा वाटतो – “हे UPA सरकार अजून सत्तेवर कसे?”
दोन मिनिटे डोळे मिटून विचार करा आणि पुढच्या निवडणुकीत मतदानाला बाहेर पडा.
Wednesday, 13 July 2011
पावसाळयाची गाणी
आता पावसाळा व्यवास्थित चालू झाला आहे. त्याला अनुसरून काही पावसाळ्याची गाणी –
बरसात के मौसम मे - www.youtube.com/watch?v=T65m6QnRihU
बारिश का बहाना है - www.youtube.com/watch?v=73Yjzx2RqB0
रिम झिंम गिरे सावन - www.youtube.com/watch?v=cmD6GfZgKX8
(* हे गाणे मला नेहेमी फार हळवे करते. एक तर गाणे सुंदर आहेच आणि त्यात जुन्या मुंबईची दृश्ये दिसतात जी मला फार nostalgic करतात. १९७०-८० सालातील मुंबई. “How green was my valley” (*अर्थात हा हिरवे(green)पणा मुंबईच्या मानाने)
काली घटा छाये मोरा जिया तरसाये - www.youtube.com/watch?v=xpWmCWsgx5w
आणि अर्थात हा Master-Piece
एक लडकी भीगी भागी सी - http://www.youtube.com/watch?v=pV1cczPv4
ह्याशिवाय अजून देखील कैक गाणी आहेत पण ही आपली आमची लिस्ट.
(* २-३ 60 किंवा 90 [*सुज्ञास अधिक सांगणे न लगे], बरोबर काहीतरी चमचमीत खायला आणि त्याबरोबर हि गाणी. विचार करा. विकेंड काही फार लांब नाही आहे)
Monday, 11 July 2011
हल्ली कथाकथन कोणीच का करत नाही?
हल्ली फारसे कुणी कथाकथन करताना दिसत नाही. पूर्वी वपु काळे, द मा मिरासदार, पु ल देशपांडे ही मंडळी फार छान कथाकथन करायची. (* पुलंचे नाव यादीत शेवटी ठेवल्यामुळे पुल प्रेमींना राग येईल पण पुल हे वपु , द मा मिरासदार ह्यांच्या एव्हडे उत्तम कथाकथन नाही करू शकायचे. कथाकथनात वपु खरे MASTER. भदे, एकबोटे इत्यादि वपुंच्या आवाजातल्या कथा आठवून पहा. असो). हल्ली हि कला लोप पावल्यासारखी वाटते आहे. लेखक स्वत कथा सांगत आहे आणि श्रोते ती तल्लीन होऊन ऐकत आहेत हे दृश्यच किती छान असायचे. भदे, एकबोटे (वपु) बाबू पैलवान, नाना चेंगट (द मा), अंतू बरवा , सखाराम गटणे (पुल) ह्या व्यक्तीरेखा लोकांच्या मनात घर करून आहेत. कथाकाथानाला परत उत्तेजन दिले पाहिजे. तुम्हाला काय वाटते?
(* दमांची “”नाना नव्याण्णवबाद” ”म्हणून एक अप्रतिम कथा आहे. ती कुठल्या साईटवर असल्यास त्याची लिंक टिप्पणी मध्ये जरूर पोस्ट करावी)
Wednesday, 6 July 2011
लोकसत्ताकारांचा “सर्वोच्च मुर्खपणा”`
लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर हे नेहेमी कॉंग्रेसची भलामण करतात हे जगजाहीर आहे. आजचा अग्रलेख हा त्याचा नमुना आहे. पहिल्यांदा ह्या लिंक - http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=168562:2011-07-05-17-37-40&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7 वर त्यांची मुक्ताफळे वाचा मग आम्ही त्यातल्या मुद्द्यांचा व्यवस्थित समाचार घेणार आहोत –
लोकसत्ता अर्थात कुमार केतकर - अण्णा हजारे आणि मंडळींच्या म्हणण्यानुसार सर्व प्रस्थापित यंत्रणांच्या डोक्यावर अत्यंत सामथ्र्यशील अशी लोकपालासारखी यंत्रणा खरोखरच तयार झाली तर काय हाहाकार उडू शकतो ते सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या आदेशाने दाखवून दिले आहे.
आम्ही – वाढती महागाई, वाढता भ्रष्टाचार, दुबळा पंतप्रधान, मुजोर मंत्री, सीबीई गैरवापर ह्याच्याहून अधिक असा काय हाहाकार उडायचा रहायला आहे?
लोकसत्ता अर्थात कुमार केतकर - तीन खांबांवर उभ्या असलेल्या लोकशाही व्यवस्थेत एका खांबाने स्वत:कडे इतरांची भूमिका घेणे योग्य नव्हे. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयाने हा धोका संभवतो.
आम्ही – कॉंग्रेसला धोका म्हणजे सगळ्या व्यवस्थेला धोका काय रे टोणगया. वास्तविक हि परिस्थिती आली कारण लोकनियुक्त सरकार आणि त्याचे प्रमुख म्हणजे पंतप्रधान हे काहीच करत नाहीत आहे. त्यांनी ह्यावर वेळीच कारवाई केली असती तर सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपाचा प्रश्नच आला नसता. खरे म्हणजे अशा कसोटीच्या क्षणी व्यवस्था उत्तम चालत आहे. सरकार नालायक निघाले म्हणून सर्वोच्च न्यायालय पुढे येऊन त्याला वठणीवर आणत आहे.
कुमार केतकर - पण सरकारी यंत्रणा त्यांची उत्तरे देत नाही म्हणून स्वत:च न्यायालयाने तपास यंत्रणेत उडी घ्यावी, हे सर्वोच्च न्यायालयाच्या उंचीस शोभणारे नाही
आम्ही – आता तुला सगळ्यांच्या उंची-खोलीची काळजी वाटायला लागली काय. जेव्हा ह्या सरकारने पी.थोमास सारखा माणूस सीवीसी म्हणून नेमला तेव्हा सीवीसी पदाची उंची काय वाढली होती काय रे लम्बुजी?
कुमार केतकर - या न्यायालयीन शोध मोहिमेचे काही घातक दुष्परिणाम होऊ शकतात आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे असतील. उदाहरणार्थ, ही नवी न्यायालयीन समिती केवळ हसन अली याच्याच काळय़ा पैशाचा शोध घेणार का? तसे असेल तर इतरांच्या काळय़ा पैशाचे काय? तसे नसल्यास फक्त हसन अलीच्या बाबतीत हा दुजाभाव का? आणि इतरांच्या काळय़ा पैशाचाही शोध घेण्याचे समजा न्यायालयाच्या समितीने ठरवल्यास ही समिती काय बँक तपासणीच्या कामातही उतरणार का? बँकिंग संदर्भातील अनेक बाबतीत रिझव्र्ह बँकेचा शब्द अंतिम मानला जातो. तेव्हा ही न्यायालयीन समिती रिझव्र्ह बँकेला मागे सारून स्वत:च बँकिंग नियामकाचे काम करणार का? त्याहूनही महत्त्वाचा मुद्दा हा की, न्यायालयाला स्वत:कडेच सगळे अधिकार घ्यावयाचे असल्यास फक्त काळा पैसाच का, अन्य महत्त्वाच्या प्रलंबित खटल्यांची चौकशीही न्यायालयांनी स्वत:कडेच घ्यावी.
आम्ही – अरे वा , तसे भरपूर लिहिले आहेस पण हे सगळे आम्ही एका वाक्यात बसवू शकतो – “लांडगा आला रे आला” . उगाच पुढच्या काल्पनिक गोष्टींची भीती दाखवून हा तपास करू नका असे म्हणतोस काय रे कोल्हया
कुमार केतकर - वास्तविक काळय़ा पैशांसंदर्भात जनतेत दंतकथेच्या पातळीवर एक सुप्ताकर्षण आहे. पण त्यास वास्तवाचे भान नाही. परदेशी बँकांत ठेवलेला सगळाच पैसा काळा असे समजण्याची चूक आपल्याकडे बरेच करतात. मॉरिशस, लिचेन्स्टाइन आदी देशांचे उत्पन्न हे करपात्र नियमावलीवर आहे. म्हणजे त्या देशात नोंदलेल्या कंपन्यांनी करारमदार केल्यास त्यांना कर भरावा लागत नाही. ही व्यवस्था पूर्ण कायदेशीर आहे. खेरीज मॉरिशससारख्या देशाशी आपण दुहेरी करविरोधी करार केला आहे. म्हणजे त्या देशात नोंदलेल्या कंपन्यांनी तेथे कर भरल्यास आपल्याला पुन्हा त्यांच्यावर कर आकारता येत नाही. या व्यवस्थेचा फायदा घेऊन अनेक कंपन्यांनी आपली कार्यालये तेथे हलवली आहेत. त्यात बेकायदेशीर काही नाही. अनेक परदेशी बँका आपल्या खातेदारांची माहिती गुप्त राखतात. तेव्हा ती माहिती न देणे हे आपल्या माहिती अधिकाराचे उल्लंघन आहे आणि त्यामुळे ती द्यायलाच हवी, असे अण्णा हजारे आदींनी म्हटल्यास ते समजण्यासारखे आहे. पण सर्वोच्च न्यायालयानेच असे म्हणावे हे अनाकलनीय आहे.
आम्ही – वा रे पठ्ठ्या. काय पण युक्तिवाद. ह्यात बेकायदेशीर असे आहे कि तिथे जमा झालेला पैश्यावर इथे जो कर भरावा लागतो न तो भरला नाही आहे. त्यासाठीच सर्वोच्च न्यायालय सरकारच्या पाठी लागले आहे.
कुमार केतकर - तेव्हा परदेशी बँकांतच काळा पैसा आहे, हा शुद्ध भाबडेपणा झाला. शिवाय तेथे जो पैसा जातो तो मॉरिशस आदी मार्गानी पांढरा होऊन भारतीय बाजारात येतो. तेव्हा, चला स्विस बँकांतील खाती खोलू आणि बॅगा भरभरून काळा पैसा घेऊन येऊ, असे जर काही जणांना वाटत असेल तर ते वास्तवाचे अज्ञानच दर्शवते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या अज्ञानाच्या प्रसारात भरच पडेल.
आम्ही – सगळा पैसा नसेल पण बराचसा आहे. तो तरी परत आणायला तुला काय प्रोब्लेम आहे. तुला वाटते आहे तसे कुणालाही वाटत नाही आहे. लोकांचे म्हणणे हेच आहे कि जो काळा पैसा परत मिळू शकतो तो तर आणा.
कुमार केतकर - यात भाजप आघाडीवर होता. त्या पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी ही सरकारला चपराक आहे, असे म्हटले आणि निर्णयाचे स्वागत केले हे त्यांच्या बालबुद्धीला साजेसेच झाले
आम्ही – बालबुद्धी ते नाहीत, तू आहेस. हा अग्रलेख ते सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे.
शेवटी आमची कुमार केतकरला एक सूचना – थोडी कमी पीत जा किंवा पिण्याच्या आधी अग्रलेख लिहीत जा. म्हणजे तू काय लिहितो आहेस ते तुझ्या लिहितानाच लक्षात येईल.
अजून एक – तू पंतप्रधानच्या भेटीला “दिव्य मराठी” चा प्रतिनिधी म्हणून गेला होतास. हे नवीन काय. तू लोकसत्ताचा संपादक न मग हे नवीन दिव्य प्रकाशन कुठले
Tuesday, 5 July 2011
महाराष्ट्र टाईम्स मधील मुद्राराक्षसाचे विनोद, दिव्य बातम्या , हसा लेको आणि इतर “वाचनीय” सदरे
हा पेपर रोजच्या रोज मराठीचा खून पाडत असतो. अहो संपादक, बातम्या महत्वाच्या आहेत हे ठीक आहे पण भाषेकडे देखील जरा लक्ष द्या. “अमृतातेही पैजा जिंके” अशा मराठी भाषेचे एवढे धिंडवडे काढू नका. आणि हो, पोयरेकरांची व्यंगचित्रे बंद करा, लवकरात लवकर. अहो तुमच्या पेपर मध्ये पूर्वी आर के लक्ष्मण व्यंगचित्रे काढायचे. त्यानंतर पोयरेकर म्हणजे ताजमहाल पाहिल्यानंतर नंतर एकदम धारावी पाहण्यासारखे आहे. पेपरमध्ये व्यंगचित्रे हवीतच असा तुमचा आग्रह असेल तर आर के लक्ष्मण यांची जुनी व्यंगचित्रे परत छापली तरी चालतील. निदान पुनर्प्रत्याचा आनंद.
वानगीदाखल महाराष्ट्र टाईम्स मधील खालील उदाहरणे पहा. इटालिक लिपी मधील मते अर्थात आमची.
“उद्योगपती अनिल अंबानी आणि बॉलिवुड अभिनेत्री करीना कपूर यांसारख्या सेलिब्रिटींची न्यूट्रिशनिस्ट असलेल्या मराठमोठ्या ऋजुता दिवेकरला नेपाळमध्येही गौरविण्यात आले”
आम्ही - मराठमोठ्या का मराठमोळ्या ??
“झुकेरबर्गची श्रीमंतीची झेप!”
आम्ही - अहो हा मथळा असा हवा – "झुकेरबर्गच्या श्रीमंतीची झेप!"
“दरम्यान , गेला जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्याने राज्यात सर्वत्र पेरण्याखोळंबल्या आहेत . चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ १८१ मिमी पावसाची नोंदझाली असून , १ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे . आणखी दोनदिवस पाऊस झाला नाही , तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यताआहे . पेरणी झाल्यानंतरचे दोन दिवस वगळले , तर सातत्याने पावसाची गरज असते. मात्र यावेळी पेरलेले बी पावसाअभावी जळून जाण्याची शक्यता आहे .”
आम्ही - ही बातमी लिहीत आहात का मराठी दुसऱ्या ईयत्तेसाठी शुध्लेखनाचा धडा. तुम्ही पेपर मध्ये लिहीत आहात. जरा “वाचनीय” लिहा.
आणि हसा लेको नावाच्या महा आचरट सदरातील दोन “विनोद” -
भिकारी : माय भाकरी दे. आजी : अजून भाकरी झाल्या नाहीत...
भिकारी : माझा मोबाइल नंबर घे आणि भाकरी झाल्यावर मिस कॉल दे!!!
आजी : मिस कॉल कशाला भाकरी झाली की, मी माझं फेसबुक स्टटस अपडेट करते ते बघ आणि ये!!!
चार आणे बंद करण्याचे कारण ...अगदी सोपे आहे .
सरकार एक अण्णा नीट सांभाळूशकत नाही .. ते चार आणा कसे काय सांभाळूशकेल ..??
(*असे “विनोद” दिवसाला एक ह्या गतीने महाराष्ट्र टाईम्स मध्ये येतात. धाडसी वाचकांनी ते वाचण्यासाठी हि लिंक - http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/2428942.cms क्लीक करावी [*आपल्या जबाबदारीवर]. आमचा रेकॉर्ड न थांबता सलग तीन विनोद वाचण्याचा (सहन करण्याचा) आहे. )
Thursday, 30 June 2011
हल्ली पूर्वीसारखा शांत काळोख पडत नाही
हल्ली दिव्यांच्या झगमगात काळोखच हरवला आहे. पूर्वी काय छान काळोख पडायचा. मोठ्या शहरांमधून देखील रात्री ९ नंतर हळू हळू सगळे शांत होऊ लागायचे. रस्ते शांत व्हायचे. रहदारी कमी व्हायची . बागेच्याजवळ वैगेरे असाल तर रातकिड्यांचे आवाज देखील ऐकू येऊ लागायाचे. ग्यालरीत , जिन्यात , गच्चीत , नाक्यावर मंडळी गप्पा मारायला जमायची. दिवसभराच्या गप्पा, मध्येच कुणाचीतरी मस्करी , राजकारण , खेळ असे काही-बाही विषय निघायचे. थोडा आचरटपणा असायचा. पण ह्या सगळ्यामुळे दिवसभराचा ताण हलका व्हायचा. मनमोकळे हसून घेता यायचे (दुसऱ्यांवर आणी स्वतः वरही)
आमच्या घरापासून स्टेशन जवळ जवळ २ किमी लांब होते पण तिकडच्या गाडीच्या शिट्टीचा आवाज रात्रीच्या शांत वेळी स्पष्ट ऐकू यायचा. झालाच तर बेस्टच्या बसचा आवाज. एखाद्या truck चा आवाज , असे सगळे ऐकताना झोप कधी यायची कळायचेच नाही. परत सकाळी मंडळी उत्साहाने कामाला तयार.
आताशा नीट काळोखच पडत नाही. टीवी तर रात्री उशिरापर्यंत चालू असतो. FaceBook वर chat करताना गप्पांचा फड मात्र रंगत नाही. रस्ते शांत होत नाहीत. लांबवरून ऐकू येणारी आगगाडीची शिटी तर कैक दिवसात ऐकली नाही. आणी रातकिड्यांची किरकिर , ती तर आता एखाद्या हॉरर सिरीयल मध्येच ऐकायला मिळते.
खरोखर पूर्वीसारखा शांत काळोख परत पडला पाहिजे .
(* हे लिहिताना आठवण झाली – पुलंचा केवळ “आवाज” ह्या विषयावरती एक अप्रतिम लेख आहे. जरूर वाचा. ह्यात रात्रीच्या आवाजांच्या वरती फार सुंदर लिहिले आहे. खासकरून कुल्फिवाल्याचा आवाजाविषयी. त्या लेखाचा काही भाग ह्या ब्लॉग वर - http://cooldeepak.blogspot.com/2008/11/blog-post.html आहे. पुस्तकाचे नाव – “उरले सुरले” लेखाचे नाव (बहुतेक) –“आवाज आवाज”)
ह्याच ब्लॉग असलेली पुलंच्या किश्श्यांची अप्रतिम लिंक - http://cooldeepak.blogspot.com/2007/01/blog-post_04.html)
Wednesday, 29 June 2011
मराठी गाण्यांची छान साईट
मराठी गाण्यांची छान साईट (शब्द आणी सूर दोन्ही) - http://manik-moti.blogspot.com
(* माझे पर्सनल फेवरीट - http://manik-moti.blogspot.com/2010/02/rang-maza-vegala.html )
Tuesday, 28 June 2011
“आता घरी गेल्यावर आजी काय म्हणेल”
तुम्हाला सांगतो ह्या साध्या संवादाने माझ्या पुढे अक्षरशः एक चित्र उभे राहिले – हि मुलगी तिच्या मामाबरोबर आजी-आजोबांकडे जात असणार. ती आई-वडिलांबरोबर अंधेरी-बोरिवली अशा ठिकाणी राहात असेल. मामा तिला घेऊन जायला आला असेल. आजी-आजोबा दादर / गिरगांव अशा ठिकाणी चाळीत राहत असणार. तिच्या आई-वडलांचे बालपण देखील चाळीत गेले असणार. दोन खोल्या असतील चाळीत. ती घरी पोहचेल तेव्हा आजी-आजोबांची जेवणे झाली असतील. आजीची आत स्वंयपाकघरात आवरा-आवरी चालू असेल. दोघांचे अर्धे लक्ष जिन्याकडे असेल. नात आल्या आल्या जोराने ओरडून हाक मारेल आणि मग आजी म्हणेल – “आलात का? या?” नात राहल्या येणार म्हणून आजी-आजोबा खुश असतील. शनिवार – रविवार नातीचे सगळे लाड पुरवले जातील. रविवारी संध्याकाळी आई-बाबा घ्यायला येतील. मग आजी-आजोंबाच्या घरून जाताना रडारड होईल. गणपती / दिवाळीत महिनाभर राहायला पाठवण्याचे वायदे होतील तेव्हा कुठे नात जायला तयार होईल. आजी-आजोबा जिन्याच्या टोकापर्यंत सोडायला येतील.
मला खात्री आहे हे असे आणी असेच झाले असणार. सगळ्याच नातवंडांचे आणि आजी-आजोबांचे असेच होते. (खास करून ज्यांचे आजी-आजोबा दादर/ गिरगांवला राहतात )
Monday, 27 June 2011
अमर अकबर अन्थोनी - "हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे“
काय मस्त लाईफ होते त्यावेळी. कॉम्पुटर सोडा , टीवी देखील फार नव्हते. पण मंडळी खुश असायची. मुले संध्याकाळी खेळायला घराच्या बाहेर असायची. गणपती, दिवाळी जोरात साजरे केले जायचे .(फराळ आणी सजावट घरात करून). चित्रपट बघणे म्हणजे वर्ष-सहा महिन्यातील चैन असायची. रविवार सकाळ हि वेळ मित्र मंडळींबरोबर गप्पा मारण्याची किंवा क्रिकेट खेळण्याची असायची .शनिवारी दुपारी टीवी वर मराठी चित्रपट असायचा आणी रविवारी संध्यकाळी हिंदी. तो बघणे म्हणजे चैन असायची. जेवायला लोक एकमेकांच्या घरी जायचे (यजमानांच्या घराजवळच्या होटेल मध्ये नव्हे), “हा माझ्या चुलत भावाचा मुलगा , तुझा चुलत चुलत भाऊ. म्हणजे घरातलाच कि रे” अशी ओळख लोक करून द्यायचे. आता चुलत सोडा, सख्खा भाऊ / बहीण असली तरी पुरे.
जाऊन द्या उगाच अजून काही आठवत बसलो तर हुंदकाच यायचा एखादेवेळी.
जाता जाता “हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे” गाण्याची लिंक - http://www.youtube.com/watch?v=0KfIdFGCXNk&feature=player_embedded
Friday, 24 June 2011
त्या गव्याला कळू नये म्हणून वसंता इंग्रजीमध्ये बोलतोय
Wednesday, 22 June 2011
वैभव जोशींची अप्रतिम कविता
वैभव जोशींची अप्रतिम कविता – http://www.facebook.com/video/video.php?v=203484086338205.
तुषार दळवी देखील. पण हल्ली फारसा दिसत नाही...
Tuesday, 21 June 2011
महाराष्ट्र टाइम्स मधील विचित्र मथळे
महाराष्ट्र टाइम्स असले विचित्र मथळे का देतो? उदाहरणार्थ हे मथळे पहा – "मुंबईच्या सर्व उपनगरीय गाड्या होणार बारा डब्यांच्या", "निर्णय आम्हाला घेऊ द्या" हे असे उलट सुलट का लिहितात कुणास ठाउक? ह्यापेक्षा सरळ मथळे का देत नाहीत? - "मुंबईच्या सर्व उपनगरीय गाड्या बारा डब्यांच्या होणार", "आम्हाला निर्णय घेऊ द्या".
इंग्लिश शब्दांचा देखिल महाराष्ट्र टाइम्स मध्ये बेसुमार वापर असतों. कधी कधी महाराष्ट्र टाइम्स वाचतो आहोत का टाइम्स ऑफ़ इंडिया असा संभ्रम होतो.
ह्याच्यावरून पुलंचा एक विनोद आठवला. त्यांनी एक लेखात विनोदाने मराठी भाषेच्या मोडतोडी संदर्भात एक पात्राच्या तोंडी असा प्रसंग लिहिला होता - “””सोन्याने मला त्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या भाषणाची प्रत दिली. भाषण असे होते - "तिला हुर्द्यात कर्कार्ल्यागत झाले. बैल दिकून आली. ..........". ते बघून मी (अर्थात ते पात्र , पुल नाही) म्हणालो - "अरे सोन्या लेका ही रे कुठली मराठी भाषा. ह्यात बैल हा एक शब्द सोडला तर दूसरा कुठलाच शब्द माझ्या ओळखीचा नाही आहे."
महाराष्ट्र टाइम्सचे असे काही होऊ नये ही अपेक्षा. नाहीतर महाराष्ट्र टाइम्स मध्ये "महाराष्ट्र" हा मराठी माणसाला ओळखता येणारा असा एकच शब्द रहायचा.
ह्यात काही अतिशयोक्ति नाही ना?
एकदा हा ज्येष्ठ कांग्रेस नेता अणि अत्रे एक समांरंभासाठी एकत्र आले. तेव्हा भाषणात अत्रेँनीं पुढील कोटि केली - "हे अमुक अमुक मोठे नेते आहेत. हे कांग्रेसचे नेते अमुक अमुक ह्यांचे चिरंजीव."
मग त्या नेत्याकडे बघून अत्रे म्हणाले - "काय हो. ह्यात काही अतिशयोक्ति नाही ना?
Monday, 20 June 2011
यमुनेच्या पाण्यावर उठले तरंग
"मातृप्रेमाचे मंगल, चित्र आले पटावार
मिळे श्यामच्या आईला राष्ट्रपतीँचा आहेर
प्रल्हादाने केले अवघ्या भारताला दंग
आज यमुनेच्या पाण्यावर उठले तरंग"
असे सरळ , सोपे, सुन्दर लिहिणारे कवी हल्ली असतात कुठे?
(* ही पूर्ण कविता कुणाला माहिती असल्यास कृपया टिपण्णी मध्ये पोस्ट करावी)
"श्यामची आई" विकिपीडिया लिंक - http://en.wikipedia.org/wiki/Shyamchi_Aai_(film)
ह्या चित्रपटातील "द्रौपदीचे बंधू शोभे नारायण " हे अप्रतिम गाणे - http://www.youtube.com/watch?v=cyAOzD6_5ms
दुट्टपीपणा म्हणजे काय?
"सरकारला धारेवर धरण्याच्या नादात लोकपालला ‘जोकपाल’ संबोधून अरविंद केजरीवाल यांनी या विधेयकाविषयी ते स्वत किती गंभीर आहेत, हे दाखवून दिले आहे".
(मूळ लेखासाठी - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=164928:2011-06-19-17-29-35&catid=30:2009-07-09-02-02-22&Itemid=8)
वास्तविक अरुण केजरीवाल ह्यांनी हे वाक्य लोकपाल बिलाच्याबद्दल सरकारचा नकारात्मक दृष्टिकोण दाखविण्यासाठी वापरले होते. तेच वाक्य वापरून असे म्हणायचे की केजरीवाल लोकपाल बिलाच्याबद्दल गंभीर नाहीत हा अव्वल दर्जाचा दुट्टपीपणा आहे.
लोकसत्ता सारख्या वृत्तपत्राची ही पत्रकारिता बघून हे असले संपादक आणि पत्रकार लोकसत्ताने कधीपासून पोसायला सुरुवात केली असे वाटते. आम्हाला लोकसत्ता आठवतो तो माधव गडकरींचा. टिळक , आगरकर, अत्रे ह्यांची परंपरा चालवणारा खरा निर्भिड संपादक ."Last of the Romans".
आता आहेत ते "Last of the Romonav" संपवून मग लिहायला "बसतात" म्हणून हे असले तर्क मांडले जातात.
Friday, 17 June 2011
पु ल नाटकांना वेळेवर का जायचे
Wednesday, 15 June 2011
वैसे भी वो घोड़ेवाला ही दिखता है
शिरीष कणेकरांनीं एक ठिकाणी संगितले होते की - "असे म्हटले जाते की नया दौर मधला टांगेवाल्याचा रोल बी आर चोप्रा ने आधी अशोककुमारला ऑफर केला होता पण त्यांने सांगितले की ह्या रोलसाठी दिलीपकुमारच योग्य आहे. असा मनाचा मोठेपणा दाखवल्याबद्द्ल अशोककुमारचे कौतुक देखिल केले जाते."
पुढे कणेकर म्हणतात - "आता ह्या bollywood मधल्या सांगण्याच्या गोष्टी देखिल असू शकतात. कदाचित असे देखिल घडले असेल की बी आर चोप्रा ने ऑफर केलेला रोल नाकारताना अशोक कुमार म्हणाला असेल - चोप्रा तुम यह रोल दिलीप को ही दे दो. वैसे भी वो घोड़ेवाला ही दिखता है."
आज ब्रेड संपला आहे
"मला मराठी फार येत नाहीं पण एक वाक्य चांगले येते ते म्हणजे - आज ब्रेड संपला आहे. मी FTII पुणे इथे शिकायला असताना डेक्कन कॉर्नर ला एका दुकानात ब्रेड आणायला जायचो. तो दुकानदार मला बहुतेक वेळेला एकच उत्तर द्यायचा - आज ब्रेड संपला आहे. त्यामुळे मला मराठीतले हे एकच वाक्य चांगले येते".
(*ह्या किश्शयाची खरी मजा कळण्यासाठी तुम्हाला पुणेरी दुकानदार अणि त्यांची गिर्हाईकाबद्दलची "आस्था" ह्यांचा अनुभव असणे जरुरी आहे. नसल्यास पु लंच्या "मुम्बैकर, पुणेकर, नागपूरकर ...." ह्या लेखातील एक वाक्य लक्षात ठेवावे. "पुण्यात राहून दुकान चालवयाचे असेल तर एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवावी. दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्याजोगी वस्तु म्हणजे गिर्हाईक")
Tuesday, 14 June 2011
एक निवेदकाची कमाल
"आपण रसिकांनी Driving License वर लिहिलेले वाचले असेल की - License is your previledge but not right. त्याचप्रमाणे Asking for once more is your previledge and not right"
त्याच्यापुढे हा निवेदक म्हणाला की - "हा previledge तुम्हाला दयायचा का नाही हे मी ठरवणार आणि आत्ता मी तो तुम्हाला देत नाही आहे"
काय बिशाद आहे रसिकांचीं ह्यावर काही बोलण्याची
Monday, 13 June 2011
मोहन आगाशेंचे अप्रतिम वाक्य
"खुपते तिथे गुप्ते" च्या एका भागात मोहन आगाशेंची मुलाखत झाली . त्यावेळी अवधूत गुप्तेने आगाशेंना एक प्रश्न विचारला की - "तुम्हाला जर नाटकच करायचे होते तर डॉक्टर होउन मेडिकलची एक सीट फुकट घालिवली असे नाहीं का वाटत?"
त्यावर आगाशे म्हणाले की - "नाही. मेडिकलमुळे माझी उपजीविका चालली. पण तरी नाटक हे माझे पहिले प्रेम होते". मग ते एक अप्रतिम वाक्य म्हणाले - "Medical profession gave me food, but Theatre gave me Appetite".
ओरिजिनल "खुपते तिथे गुप्ते"चा भाग बघण्यासाठी लिंक - http://www.mypopkorn.com/tv/khupte-tithe-gupte-april-1-episode-video-part-1.html
Sunday, 12 June 2011
वपुंचे एक सुंदर वाक्य
"खर्च झाल्याचे दु:ख़ नसते , हिशेब लागला नाही की वाईट वाटते"
वपु आणि इतर कथाकथन लिंक -
http://www.marathifm.com/Marathi%20Kathakathan/
Thursday, 9 June 2011
शिडी (C.D.) गेल्यापासून समदे लोंबकळत्यात
"विच्छा" च्या प्रयोगाला खुद्द सी डी देशमुख आले होते. सी डी देशमुख म्हणजे भारताचे माजी अर्थमंत्री (आणि बहुदा महाराष्ट्राचे शेवटचे स्वाभिमानी मंत्री ). तेव्हा ते नेहरुंशी (सयुंक्त महाराष्ट्रासाठी) मतभेद झाल्यामुळे राजीनामा देऊन परत आले होते.
त्यांना पहिल्या रांगेत बसलेले बघून दादांच्या सहकलाकरांनी दादांना त्यांच्यावर काही कोटि करण्यास सांगितले . दादांना सी डी देशमुखांबद्दल आदर होता. त्यांनी खालीलप्रमाणे कोटि केली
दादा त्या प्रयोगात प्रधानाचे काम करत होते . जेव्हा राजाच्या पात्राने त्यांना विचारले की - "काय प्रधानजी राज्याची हालहवाल कशी आहे?"
तेव्हा दादा पटकन म्हणाले की - "काय सांगू महाराज, शिडी (C.D.) गेल्यापासून समदे लोंबकळत्यात "
अर्थात ह्याचा संदर्भ सी डी देशमुख ह्यांच्या नेहरुंबरोबरच्या मतभेदाशी आणि राजिन्यामाशी होता
ही चपखल कोटि ऐकून खुद्द सी डी देशमुखांनी देखिल मनापासून दाद दिली
आता सी डी देशमुखांची माहिती फार कमी जणांना असते . त्यांच्या माहितीसाठी बघा - http://en.wikipedia.org/wiki/C._D._Deshmukh
Wednesday, 8 June 2011
राम जन्माला ग सखी राम जन्माला
त्यावर गदिमा म्हणाले "अग राम जन्माला येतोय। तो काय माडगुळयाचा गजानन थोडाच आहे. वेळ लागायचाच"
ग दि माडगूळकर वेब साईट - http://www.gadima.com/
(* वरील किस्सा ओरिजिनल स्वरूपात वाचायचा असल्यास - http://www.gadima.com/geet-ramayan/index.php)
Tuesday, 7 June 2011
पत्रकार कसा असावा
अत्रे म्हणाले - "उत्तम पत्रकार हा मांजरासारखा असावा"
काहीच न कळा़ल्यामुळे त्या माणसाने परत विचारले की - "म्हणजे कसा"
त्यावर अत्रे म्हणाले की - "उत्तम पत्रकाराने मांजरासारखेच दिसेल त्या उघड्या भांड्यात तोंड घातलेच पाहिजे"
Monday, 6 June 2011
चांगले भाषण कसे असावे
एक शब्द्प्रभुने दुसरयला दिलेली अप्रतिम दाद.
लेखक कशासाठी लिहितो
त्यावर माडगुळकर यांनी फार मार्मिक उत्तर दिले
ते म्हणाले - "मी पैश्यासाठी लिहित नाही , पण जे लिहितो त्याचे पैसे नक्की घेतो"