Thursday, 30 June 2011

हल्ली पूर्वीसारखा शांत काळोख पडत नाही

हल्ली दिव्यांच्या झगमगात काळोखच हरवला आहे. पूर्वी काय छान काळोख पडायचा. मोठ्या शहरांमधून देखील रात्री ९ नंतर हळू हळू सगळे शांत होऊ लागायचे. रस्ते शांत व्हायचे. रहदारी कमी व्हायची . बागेच्याजवळ वैगेरे असाल तर रातकिड्यांचे आवाज देखील ऐकू येऊ लागायाचे. ग्यालरीत , जिन्यात , गच्चीत , नाक्यावर मंडळी गप्पा मारायला जमायची. दिवसभराच्या गप्पा, मध्येच कुणाचीतरी मस्करी , राजकारण , खेळ असे काही-बाही विषय निघायचे. थोडा आचरटपणा असायचा. पण ह्या सगळ्यामुळे दिवसभराचा ताण हलका व्हायचा. मनमोकळे हसून घेता यायचे (दुसऱ्यांवर आणी स्वतः वरही)

आमच्या घरापासून स्टेशन जवळ जवळ २ किमी लांब होते पण तिकडच्या गाडीच्या शिट्टीचा आवाज रात्रीच्या शांत वेळी स्पष्ट ऐकू यायचा. झालाच तर बेस्टच्या बसचा आवाज. एखाद्या truck चा आवाज , असे सगळे ऐकताना झोप कधी यायची कळायचेच नाही. परत सकाळी मंडळी उत्साहाने कामाला तयार.

आताशा नीट काळोखच पडत नाही. टीवी तर रात्री उशिरापर्यंत चालू असतो. FaceBook वर chat करताना गप्पांचा फड मात्र रंगत नाही. रस्ते शांत होत नाहीत. लांबवरून ऐकू येणारी आगगाडीची शिटी तर कैक दिवसात ऐकली नाही. आणी रातकिड्यांची किरकिर , ती तर आता एखाद्या हॉरर सिरीयल मध्येच ऐकायला मिळते.

खरोखर पूर्वीसारखा शांत काळोख परत पडला पाहिजे .

(* हे लिहिताना आठवण झाली – पुलंचा केवळ आवाज ह्या विषयावरती एक अप्रतिम लेख आहे. जरूर वाचा. ह्यात रात्रीच्या आवाजांच्या वरती फार सुंदर लिहिले आहे. खासकरून कुल्फिवाल्याचा आवाजाविषयी. त्या लेखाचा काही भाग ह्या ब्लॉग वर - http://cooldeepak.blogspot.com/2008/11/blog-post.html आहे. पुस्तकाचे नाव – उरले सुरले लेखाचे नाव (बहुतेक) –आवाज आवाज)

ह्याच ब्लॉग असलेली पुलंच्या किश्श्यांची अप्रतिम लिंक - http://cooldeepak.blogspot.com/2007/01/blog-post_04.html)

Wednesday, 29 June 2011

मराठी गाण्यांची छान साईट

मराठी गाण्यांची छान साईट (शब्द आणी सूर दोन्ही) - http://manik-moti.blogspot.com
(* माझे पर्सनल फेवरीट - http://manik-moti.blogspot.com/2010/02/rang-maza-vegala.html )

Tuesday, 28 June 2011

“आता घरी गेल्यावर आजी काय म्हणेल”

काही वर्षापूर्वीची गोष्ट. मी रात्री उशीराच्या लोकलने अंधेरीहून दादरला येत होतो. शनिवार होता. माझ्यासमोर एक माणूस एक लहान मुलीबरोबर बसला होता. दोघांच्या गप्पा चालू होत्या. तो माणूस म्हणाला – “आता घरी गेल्यावर आजी काय म्हणेल”. ती लहान मुलगी म्हणाली – “आजी म्हणेल – आलात का? या?”
तुम्हाला सांगतो ह्या साध्या संवादाने माझ्या पुढे अक्षरशः एक चित्र उभे राहिले – हि मुलगी तिच्या मामाबरोबर आजी-आजोबांकडे जात असणार. ती आई-वडिलांबरोबर अंधेरी-बोरिवली अशा ठिकाणी राहात असेल. मामा तिला घेऊन जायला आला असेल. आजी-आजोबा दादर / गिरगांव अशा ठिकाणी चाळीत राहत असणार. तिच्या आई-वडलांचे बालपण देखील चाळीत गेले असणार. दोन खोल्या असतील चाळीत. ती घरी पोहचेल तेव्हा आजी-आजोबांची जेवणे झाली असतील. आजीची आत स्वंयपाकघरात आवरा-आवरी चालू असेल. दोघांचे अर्धे लक्ष जिन्याकडे असेल. नात आल्या आल्या जोराने ओरडून हाक मारेल आणि मग आजी म्हणेल – “आलात का? या?” नात राहल्या येणार म्हणून आजी-आजोबा खुश असतील. शनिवार – रविवार नातीचे सगळे लाड पुरवले जातील. रविवारी संध्याकाळी आई-बाबा घ्यायला येतील. मग आजी-आजोंबाच्या घरून जाताना रडारड होईल. गणपती / दिवाळीत महिनाभर राहायला पाठवण्याचे वायदे होतील तेव्हा कुठे नात जायला तयार होईल. आजी-आजोबा जिन्याच्या टोकापर्यंत सोडायला येतील.
मला खात्री आहे हे असे आणी असेच झाले असणार. सगळ्याच नातवंडांचे आणि आजी-आजोबांचे असेच होते. (खास करून ज्यांचे आजी-आजोबा दादर/ गिरगांवला राहतात )

Monday, 27 June 2011

अमर अकबर अन्थोनी - "हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे“

आज “हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे” हे “अमर अकबर अन्थोनी ” मधले गाणे ऐकताना एकदम लहानपणाची आठवण झाली १९७० ची शेवटची पाच वर्षे आणी ८० ची पहिली पाच वर्षे. खास करून १९७८ , ७९, ८०, ८१, ८२ .....
काय मस्त लाईफ होते त्यावेळी. कॉम्पुटर सोडा , टीवी देखील फार नव्हते. पण मंडळी खुश असायची. मुले संध्याकाळी खेळायला घराच्या बाहेर असायची. गणपती, दिवाळी जोरात साजरे केले जायचे .(फराळ आणी सजावट घरात करून). चित्रपट बघणे म्हणजे वर्ष-सहा महिन्यातील चैन असायची. रविवार सकाळ हि वेळ मित्र मंडळींबरोबर गप्पा मारण्याची किंवा क्रिकेट खेळण्याची असायची .शनिवारी दुपारी टीवी वर मराठी चित्रपट असायचा आणी रविवारी संध्यकाळी हिंदी. तो बघणे म्हणजे चैन असायची. जेवायला लोक एकमेकांच्या घरी जायचे (यजमानांच्या घराजवळच्या होटेल मध्ये नव्हे), “हा माझ्या चुलत भावाचा मुलगा , तुझा चुलत चुलत भाऊ. म्हणजे घरातलाच कि रे” अशी ओळख लोक करून द्यायचे. आता चुलत सोडा, सख्खा भाऊ / बहीण असली तरी पुरे.

जाऊन द्या उगाच अजून काही आठवत बसलो तर हुंदकाच यायचा एखादेवेळी.
जाता जाता “हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे” गाण्याची लिंक - http://www.youtube.com/watch?v=0KfIdFGCXNk&feature=player_embedded

Friday, 24 June 2011

त्या गव्याला कळू नये म्हणून वसंता इंग्रजीमध्ये बोलतोय

पुलंची एक कोटी – “एकदा पुल, वसंतराव देशपांडे , सुनीताबाई आणि काहीजण गाडीने जात होते. घाटातून जाताना गाडीपुढे एक गवा (रानटी बैल) आला. ड्राइवर ने गाडी थांबवली. तो गवा गाडीकडे बघत खुराने जमीन उकरू लागला. गव्याच्यात एवढी ताकद असते कि तो एका धडकेने ट्रक उलटून देवू शकतो. वसंतराव देशपांडे ते बघून पुलंना म्हणाले – “लुक भाई, ही इज चार्जींग ” ते ऐकून तशाही परिंस्थितीत पुल पटकन म्हणाले – “बघा, त्या गव्याला कळू नये म्हणून वसंता इंग्रजीमध्ये बोलतोय”

Wednesday, 22 June 2011

वैभव जोशींची अप्रतिम कविता

वैभव जोशींची अप्रतिम कविता – http://www.facebook.com/video/video.php?v=203484086338205.

ही कविता सचिन खेडेकरांनी खुपते तिथे गुप्ते ह्या कार्यक्रमात म्हटली होती. सचिन खेडेकर मराठीमधील एक सुरेख (आणि हुशार) अभिनेता.

तुषार दळवी देखील. पण हल्ली फारसा दिसत नाही...

Tuesday, 21 June 2011

महाराष्ट्र टाइम्स मधील विचित्र मथळे

महाराष्ट्र टाइम्स असले विचित्र मथळे का देतो? उदाहरणार्थ हे मथळे पहा – "मुंबईच्या सर्व उपनगरीय गाड्या होणार बारा डब्यांच्या", "निर्णय आम्हाला घेऊ द्या" हे असे उलट सुलट का लिहितात कुणास ठाउक? ह्यापेक्षा सरळ मथळे का देत नाहीत? - "मुंबईच्या सर्व उपनगरीय गाड्या बारा डब्यांच्या होणार", "आम्हाला निर्णय घेऊ द्या".

इंग्लिश शब्दांचा देखिल महाराष्ट्र टाइम्स मध्ये बेसुमार वापर असतों. कधी कधी महाराष्ट्र टाइम्स वाचतो आहोत का टाइम्स ऑफ़ इंडिया असा संभ्रम होतो.

ह्याच्यावरून पुलंचा एक विनोद आठवला. त्यांनी एक लेखात विनोदाने मराठी भाषेच्या मोडतोडी संदर्भात एक पात्राच्या तोंडी असा प्रसंग लिहिला होता - “””सोन्याने मला त्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या भाषणाची प्रत दिली. भाषण असे होते - "तिला हुर्द्यात कर्कार्ल्यागत झाले. बैल दिकून आली. ..........". ते बघून मी (अर्थात ते पात्र , पुल नाही) म्हणालो - "अरे सोन्या लेका ही रे कुठली मराठी भाषा. ह्यात बैल हा एक शब्द सोडला तर दूसरा कुठलाच शब्द माझ्या ओळखीचा नाही आहे."

महाराष्ट्र टाइम्सचे असे काही होऊ नये ही अपेक्षा. नाहीतर महाराष्ट्र टाइम्स मध्ये "महाराष्ट्र" हा मराठी माणसाला ओळखता येणारा असा एकच शब्द रहायचा.

ह्यात काही अतिशयोक्ति नाही ना?

पुण्यातल्या एक ज्येष्ट कांग्रेस नेत्याने एकदा अत्रेंवर असा आरोप केला की - अत्रे फार अतिशयोक्ति करतात . (ह्या नेत्याचे वडिल देखिल स्वातंत्र्यपुर्व काळातील कांग्रेसचे बड़े नेते होते)
एकदा हा ज्येष्ठ कांग्रेस नेता अणि अत्रे एक समांरंभासाठी एकत्र आले. तेव्हा भाषणात अत्रेँनीं पुढील कोटि केली - "हे अमुक अमुक मोठे नेते आहेत. हे कांग्रेसचे नेते अमुक अमुक ह्यांचे चिरंजीव."
मग त्या नेत्याकडे बघून अत्रे म्हणाले - "काय हो. ह्यात काही अतिशयोक्ति नाही ना?

Monday, 20 June 2011

यमुनेच्या पाण्यावर उठले तरंग

माझ्या वडिलांनी ही आठवण मला सांगितली होती. "श्यामची आई" ह्या आचार्य अत्रेंनी दिगदार्शित केलेल्या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळाले होते (१९५४ साली). त्यावेळी एका वृत्तपत्राने (किंवा मासिकाने) स्पर्धा आयोजित केली. ह्या चित्रपटावर गौरवपर कविता करायची, ज्याचे ध्रुवपद "यमुनेच्या पाण्यावर उठले तरंग" असे असले पाहिजे. पारितोषिक मिळालेल्या कवितेचे शेवटचे कड़वे खालिलप्रमाणे होते.

"मातृप्रेमाचे मंगल, चित्र आले पटावार
मिळे श्यामच्या आईला राष्ट्रपतीँचा आहेर
प्रल्हादाने केले अवघ्या भारताला दंग
आज यमुनेच्या पाण्यावर उठले तरंग"

असे सरळ , सोपे, सुन्दर लिहिणारे कवी हल्ली असतात कुठे?
(* ही पूर्ण कविता कुणाला माहिती असल्यास कृपया टिपण्णी मध्ये पोस्ट करावी)

"श्यामची आई" विकिपीडिया लिंक - http://en.wikipedia.org/wiki/Shyamchi_Aai_(film)
ह्या चित्रपटातील "द्रौपदीचे बंधू शोभे नारायण " हे अप्रतिम गाणे - http://www.youtube.com/watch?v=cyAOzD6_5ms

दुट्टपीपणा म्हणजे काय?

दुट्टपीपणा म्हणजे काय? ह्याचे उत्तम उदहारण पाहायचे असल्यास आज (२० जून २०११) चे लोकसत्ता मधील "लाल किल्ल्यावारून" ह्या सदरातील खालील वाक्य वाचा -
"सरकारला धारेवर धरण्याच्या नादात लोकपालला ‘जोकपाल’ संबोधून अरविंद केजरीवाल यांनी या विधेयकाविषयी ते स्वत किती गंभीर आहेत, हे दाखवून दिले आहे".
(मूळ लेखासाठी - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=164928:2011-06-19-17-29-35&catid=30:2009-07-09-02-02-22&Itemid=8)
वास्तविक अरुण केजरीवाल ह्यांनी हे वाक्य लोकपाल बिलाच्याबद्दल सरकारचा नकारात्मक दृष्टिकोण दाखविण्यासाठी वापरले होते. तेच वाक्य वापरून असे म्हणायचे की केजरीवाल लोकपाल बिलाच्याबद्दल गंभीर नाहीत हा अव्वल दर्जाचा दुट्टपीपणा आहे.

लोकसत्ता सारख्या वृत्तपत्राची ही पत्रकारिता बघून हे असले संपादक आणि पत्रकार लोकसत्ताने कधीपासून पोसायला सुरुवात केली असे वाटते. आम्हाला लोकसत्ता आठवतो तो माधव गडकरींचा. टिळक , आगरकर, अत्रे ह्यांची परंपरा चालवणारा खरा निर्भिड संपादक ."Last of the Romans".

आता आहेत ते "Last of the Romonav" संपवून मग लिहायला "बसतात" म्हणून हे असले तर्क मांडले जातात.

Friday, 17 June 2011

पु ल नाटकांना वेळेवर का जायचे

पुलंनी एक ठिकाणी म्हटले आहे - " मी नाटकांना सहसा वेळेवर जातो. काय होते की आपण जर का वेळेच्या आधी पोहचलो तर आपण नाटक सुरु होइस्तोवर बाहेर रस्त्यावरची मजा बघत वेळ घालवतो आणि नाटक सुरु झाले की बर्र्याचदा असे वाटते की - आपण टिकीट काढून बघत असलेल्या नाटकापेक्षा बाहेरची फुकटची मजाच चांगली होती."

Wednesday, 15 June 2011

वैसे भी वो घोड़ेवाला ही दिखता है

शिरीष कणेकरांनीं एक ठिकाणी संगितले होते की - "असे म्हटले जाते की नया दौर मधला टांगेवाल्याचा रोल बी आर चोप्रा ने आधी अशोककुमारला ऑफर केला होता पण त्यांने सांगितले की ह्या रोलसाठी दिलीपकुमारच योग्य आहे. असा मनाचा मोठेपणा दाखवल्याबद्द्ल अशोककुमारचे कौतुक देखिल केले जाते."

पुढे कणेकर म्हणतात - "आता ह्या bollywood मधल्या सांगण्याच्या गोष्टी देखिल असू शकतात. कदाचित असे देखिल घडले असेल की बी आर चोप्रा ने ऑफर केलेला रोल नाकारताना अशोक कुमार म्हणाला असेल - चोप्रा तुम यह रोल दिलीप को ही दे दो. वैसे भी वो घोड़ेवाला ही दिखता है."

आज ब्रेड संपला आहे

विधू विनोद चोप्रा (परिंदा, मुन्नाभाई आदींचा दिगदर्शक) ह्याने एका मराठी पुरस्कार सोहळ्याप्रसंगी एक छान किस्सा सांगितला होता. तो म्हणाला की -
"मला मराठी फार येत नाहीं पण एक वाक्य चांगले येते ते म्हणजे - आज ब्रेड संपला आहे. मी FTII पुणे इथे शिकायला असताना डेक्कन कॉर्नर ला एका दुकानात ब्रेड आणायला जायचो. तो दुकानदार मला बहुतेक वेळेला एकच उत्तर द्यायचा - आज ब्रेड संपला आहे. त्यामुळे मला मराठीतले हे एकच वाक्य चांगले येते".

(*ह्या किश्शयाची खरी मजा कळण्यासाठी तुम्हाला पुणेरी दुकानदार अणि त्यांची गिर्हाईकाबद्दलची "आस्था" ह्यांचा अनुभव असणे जरुरी आहे. नसल्यास पु लंच्या "मुम्बैकर, पुणेकर, नागपूरकर ...." ह्या लेखातील एक वाक्य लक्षात ठेवावे. "पुण्यात राहून दुकान चालवयाचे असेल तर एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवावी. दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्याजोगी वस्तु म्हणजे गिर्हाईक")

Tuesday, 14 June 2011

एक निवेदकाची कमाल

एका गाण्याच्या प्रोग्राम मध्ये रसिकांनी फारच वन्स मोअर घेतल्यामुळे निवेदकाने खालीलप्रमाणे रसिकांना समज दिली

"आपण रसिकांनी Driving License वर लिहिलेले वाचले असेल की - License is your previledge but not right. त्याचप्रमाणे Asking for once more is your previledge and not right"

त्याच्यापुढे हा निवेदक म्हणाला की - "हा previledge तुम्हाला दयायचा का नाही हे मी ठरवणार आणि आत्ता मी तो तुम्हाला देत नाही आहे"

काय बिशाद आहे रसिकांचीं ह्यावर काही बोलण्याची

Monday, 13 June 2011

मोहन आगाशेंचे अप्रतिम वाक्य

"खुपते तिथे गुप्ते" च्या एका भागात मोहन आगाशेंची मुलाखत झाली . त्यावेळी अवधूत गुप्तेने आगाशेंना एक प्रश्न विचारला की - "तुम्हाला जर नाटकच करायचे होते तर डॉक्टर होउन मेडिकलची एक सीट फुकट घालिवली असे नाहीं का वाटत?"
त्यावर आगाशे म्हणाले की - "नाही. मेडिकलमुळे माझी उपजीविका चालली. पण तरी नाटक हे माझे पहिले प्रेम होते". मग ते एक अप्रतिम वाक्य म्हणाले - "Medical profession gave me food, but Theatre gave me Appetite".
ओरिजिनल "खुपते तिथे गुप्ते"चा भाग बघण्यासाठी लिंक - http://www.mypopkorn.com/tv/khupte-tithe-gupte-april-1-episode-video-part-1.html

Sunday, 12 June 2011

वपुंचे एक सुंदर वाक्य

वपुंची अनेक सुंदर वाक्य प्रसिद्ध आहे त्यातलेच हे एक मनाला भिडून जाते -
"खर्च झाल्याचे दु:ख़ नसते , हिशेब लागला नाही की वाईट वाटते"

वपु आणि इतर कथाकथन लिंक -
http://www.marathifm.com/Marathi%20Kathakathan/

Thursday, 9 June 2011

शिडी (C.D.) गेल्यापासून समदे लोंबकळत्यात

दादा कोंडकेंच्या "विच्छा माझी पूरी करा" वगाबद्दलची एक आठवण .
"विच्छा" च्या प्रयोगाला खुद्द सी डी देशमुख आले होते. सी डी देशमुख म्हणजे भारताचे माजी अर्थमंत्री (आणि बहुदा महाराष्ट्राचे शेवटचे स्वाभिमानी मंत्री ). तेव्हा ते नेहरुंशी (सयुंक्त महाराष्ट्रासाठी) मतभेद झाल्यामुळे राजीनामा देऊन परत आले होते.
त्यांना पहिल्या रांगेत बसलेले बघून दादांच्या सहकलाकरांनी दादांना त्यांच्यावर काही कोटि करण्यास सांगितले . दादांना सी डी देशमुखांबद्दल आदर होता. त्यांनी खालीलप्रमाणे कोटि केली

दादा त्या प्रयोगात प्रधानाचे काम करत होते . जेव्हा राजाच्या पात्राने त्यांना विचारले की - "काय प्रधानजी राज्याची हालहवाल कशी आहे?"
तेव्हा दादा पटकन म्हणाले की - "काय सांगू महाराज, शिडी (C.D.) गेल्यापासून समदे लोंबकळत्यात "

अर्थात ह्याचा संदर्भ सी डी देशमुख ह्यांच्या नेहरुंबरोबरच्या मतभेदाशी आणि राजिन्यामाशी होता
ही चपखल कोटि ऐकून खुद्द सी डी देशमुखांनी देखिल मनापासून दाद दिली

आता सी डी देशमुखांची माहिती फार कमी जणांना असते . त्यांच्या माहितीसाठी बघा - http://en.wikipedia.org/wiki/C._D._Deshmukh

Wednesday, 8 June 2011

राम जन्माला ग सखी राम जन्माला

अशी एक आठवण सांगितली जाते कि जेव्हा ग दि माडगुळकर "राम जन्माला ग सखी राम जन्माला " हे गाणे लिहित होते तेव्हा बराच वेळ झाला तरी त्यांना गाणे नीट सुचत नव्हते। त्यांच्या पत्नीने त्यांना विचारले - "काय हो इतका वेळ का लागतो आहे ?"
त्यावर गदिमा म्हणाले "अग राम जन्माला येतोय। तो काय माडगुळयाचा गजानन थोडाच आहे. वेळ लागायचाच"

ग दि माडगूळकर वेब साईट - http://www.gadima.com/
(* वरील किस्सा ओरिजिनल स्वरूपात वाचायचा असल्यास - http://www.gadima.com/geet-ramayan/index.php)

Tuesday, 7 June 2011

पत्रकार कसा असावा

प्र के अत्रे यांना कोणीतरी प्रश्न विचारला की - "उत्तम पत्रकार कसा असावा ?"
अत्रे म्हणाले - "उत्तम पत्रकार हा मांजरासारखा असावा"
काहीच न कळा़ल्यामुळे त्या माणसाने परत विचारले की - "म्हणजे कसा"
त्यावर अत्रे म्हणाले की - "उत्तम पत्रकाराने मांजरासारखेच दिसेल त्या उघड्या भांड्यात तोंड घातलेच पाहिजे"

Monday, 6 June 2011

चांगले भाषण कसे असावे

एकदा अत्रे ह्यांच्याबद्दल बोलताना पुल म्हणाले - "अत्रे सुन्दर भाषण करायचे. आता सुन्दर भाषण म्हणजे कसे असावे तर - पंडितांची पगड़ी तर कौतुकाने हललिच पाहिजे पण सामन्यांचे अंतकरण देखिल हलले पाहिजे"

एक शब्द्प्रभुने दुसरयला दिलेली अप्रतिम दाद.

लेखक कशासाठी लिहितो

एकदा ग दि माडगुळकर यांना एकाने खवचटपणे विचारले की - "तुम्ही देखिल पैश्यासाठी लिहिता का"
त्यावर माडगुळकर यांनी फार मार्मिक उत्तर दिले
ते म्हणाले - "मी पैश्यासाठी लिहित नाही , पण जे लिहितो त्याचे पैसे नक्की घेतो"